बिलोली – जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी यासाठी तालुक्यातील लघुळ व माचनूर ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी तसेच पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे. माचनूर ग्रामपंचायतने गावात दवंडी देऊन पालकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
तालुक्यासह महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी – शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक सरसावत असल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद शाळा राहतील का नाही अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण होत आहे याच अनुषंगाने बिलोली तालुक्यातील लघुळ व माचनूर ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांची संख्या वाढावी यासाठी मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला असून ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास त्या कुटुंबाच्या घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा मोठा निर्णय
ग्रामपंचायतने एका ठरावाद्वारे घेतला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये असा ठराव घेणाऱ्या पहिल्याच ग्रामपंचायत ठरल्या आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पैसा लागत आहे. अशावेळी गरीब कुटुंबात असलेल्या मुलांना अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणे परवडत नाही यामुळे आर्थिक संकटाला पालकांना सामोरे जावे लागत आहे.
विद्यमान स्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा चांगले हुशार व होतकरू शिक्षक असतानाही मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश देणे पालक टाळत आहेत. यामुळे लघुळ व माचनूर येथील ग्रामपंचायतीने पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले असून सदरील ग्रामपंचायतीचे शैक्षणिक स्तरातून मोठे कौतुक होत आहे. तर असा निर्णय घेणाऱ्या लघुळ व माचनूर ग्रामपंचायती ह्या जिल्ह्यात पहिल्या ठरल्या आहेत. याचे अनुकरण तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी करावे, अशी अपेक्षा मराठी प्रेमींकडून व्यक्त होत आहे.
जि.प. शाळेमधली पटसंख्या कमी होत आहे. पालकांची परिस्थिती नाजूक असतानाही इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश देऊन मेटाकुटीस येत आहेत त्यामुळे हा निर्णय घेतला.
– विजय निलंगेकर