Home / राजकारण / २६ ला नांदेडमध्ये अमित शाह यांची ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभा

२६ ला नांदेडमध्ये अमित शाह यांची ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभा

नांदेड – केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह येत्या सोमवारी २६ मे रोजी दुपारी २ वाजता नवा मोंढा, नांदेड येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभेला संबोधित करणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी नेते सुद्धा मार्गदर्शन करणार असल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.
अमित शाह यांच्या नांदेड दौऱ्याची माहिती देण्यासाठी नांदेड जिल्हा भाजपच्या वतीने आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले की, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री २५ ते २७ मे दरम्यान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नवा मोंढा, नांदेड येथे दुपारी २ वाजता आयोजित ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभा हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य कार्यक्रम असून, यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा.डॉ. भागवत कराड, पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह अनेक आमदार व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहतील. नांदेड जिल्ह्यातील पावसाचे वातावरण लक्षात घेता या सभेसाठी विशाल वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. वेळेवर पाऊस आला तरीही सुरळीतपणे मोठी सभा होईल, असा विश्वास व्यक्त करून खा. चव्हाण यांनी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सोमवारी २६ मे रोजी साधारणतः दुपारी १.१५ वाजता नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १.३० वाजता वसंतराव नाईक चौक, नांदेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. हा पुतळा नांदेड-वाघाळा शहर महानगर पालिकेने उभारला आहे. दुपारी १.४५ वाजता भाग्यनगर रोड, विद्युत नगर चौक येथे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता नाना-नानी पार्क समोर उभारण्यात आलेल्या भाजप महानगर कार्यालयाचे उद्घाटन अमित शाह व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. भाजपचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. त्याच रात्री केंद्रीय गृहमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी पुढे दिली.
पत्रकार परिषदेला खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, दक्षिण ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, विजय गंभीरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे संचालन जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.

One Comment

  • Greetings! This is my first comment here so I just wanted to give a quick shout out and tell you I genuinely enjoy reading through your posts. Can you suggest any other blogs/websites/forums that go over the same subjects? Thanks for your time!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल