नांदेड – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचलनालयामार्फत 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. महाराष्ट राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी तंत्रनिकेतन संस्थांसाठी 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिले जातात. सदरील प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. नावनोंदणी केल्यानंतर सर्व कागदपत्रांची प्रत्यक्ष संस्थेत जाऊन फिजिकल पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करता येते तसेच नावनोंदणी करताना अर्ज अचूक भरणे व अधिकृत सुविधा केंद्रातून पडताळणी करून कन्फर्म करणे अत्यावश्यक आहे अन्यथा विद्यार्थ्यांचा अर्ज बाद हून प्रवेश प्रक्रियेतून बाहेर येऊ शकतो.
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.dte.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक सहयोग कॅम्पस, विष्णुपुरी येथे शासनमान्य अधिकृत सुविधा केंद्र उपलब्ध असून सदरील केंद्रावर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध आहे. तसेच महाविद्यालयाच्या वतीने पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेतील विविध शंकांचे समाधान, उपलब्ध असलेल्या विविध शाखा, संस्थाची निवड, पसंती अर्ज भरण्यासंबंधीची माहिती, प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे विविध कागदपत्रे, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सवलती याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्र उपलब्ध असून तिथे प्राध्यापकांमार्फत विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रथम वर्ष प्रवेशासाठी संस्थेच्या सुविधा केंद्रास भेट द्यावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईशान अग्रवाल (9028062765) यांनी केले आहे.