लोकसेवा आयोग (युपीएससी) चा निकाल जाहीर झाला आहे. नांदेडच्या डॉ. आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेला विद्यार्थी आयुष राहुल कोकाटे याने ५१३ वी रँक मिळवून देशभरात नांदेडचे नाव लौकिक केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये डॉ. आंबेडकरनगरचा विद्यार्थी आयुष कोकाटे यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून युपीएससी परिक्षेच्या अभ्यासाची तयारी केली होती. कोकाटे यांचे प्राथमिक शिक्षण
केंद्रीय विद्यालय संभाजीनगर येथे झाले आहे. सुरूवातीपासूनच अभ्यासाची आवड असणारे आयुष यांचे पुढील शिक्षण पुणे येथील आयएलएस कॉलेजमध्ये लॉ पदवीपर्यंतचे झाले आहे. एक अभ्यासू आणि जिद्द असणारा विद्यार्थी हा घरीच दहा ते बारा तास अभ्यास करीत असे. गेल्या चार वर्षापासून त्यांनी जोरदार तयारी केल्यामुळे अखेर त्यांना यशाने गवसणी घातली आहे.
या यशाबद्दल बोलताना कोकाटे म्हणाले युपीएससी परिक्षेच्या अभ्यासाचे दररोज दहा नियोजन केले. दररोज शेड्युलप्रमाणे वेगवेगळ्या विषयांना वेळ देत होतो. याचबरोबर वेगवेगळे प्रयोग देखील केले आहेत. विशेष मी कोणतीही खासगी शिकवणी घेतलेली नाही. मला नेहमीच आई-वडीलांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच हे यश मिळाले आहे. भविष्यात आपण देशसेवेसाठी पुढील आयुष्य देऊन सेवा करणार आहोत, अशी ही प्रतिक्रिया आयुष कोकाटे यांनी दिली.
आयुष यांचे वडील राहुल कोकाटे हे सध्या भविष्य निर्वाह निधी कार्यालय पुणे येथे प्रवर्तन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे देखील शिक्षण डॉ. आंबेडकरनगर भागात राहूनच अधिकारी पदापर्यंत पोहचले आहेत. आयुष यांनी देखील युपीएससी परिक्षेत ५१३ वी रँक मिळविल्याने नांदेडच्या डॉ. आंबेडकर नगरामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
