नांदेड येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नवज्योत फाउंडेशनच्या संस्कार शिबिराने विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः ज्ञानाचे भंडार उघडले असून विद्यार्थी तल्लीन होऊन या ज्ञानामृताचे ग्रहण करीत आहेत.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात गुरुद्वारा बोर्डाचे सेवानिवृत्त अधीक्षक तथा नवज्योत फाउंडेशनचे रणजीतसिंग चिरागिया यांनी विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाचे बीजरोपण केले. प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने केले तर ती सुद्धा देशसेवाच आहे, असा त्यांच्या व्याख्यानाचा मतितार्थ होता. दुसऱ्या सत्रात अहिल्यानगर (अहमदनगर) येथील साहित्यिक संजय कळमकर यांनी मला काहीतरी सांगायचंय या विषयावर सध्या सुरू असलेल्या टीव्ही मालिका आणि
सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम या क्लिष्ट बाबी अतिशय हसत खेळत विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविल्या.
दुसऱ्या सत्रात मी कसा घडलो, या विषयावर प्रा. महेश मोरे, निसर्ग हाच खरा शिक्षक या विषयावर प्रा. बालाजी कोम्पलवार यांनी विचार मांडले. प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून सतपालसिंग गिल यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन करून त्यांच्या सामान्य ज्ञान वाढविले. मान्यवरांचा सत्कार नवज्योत फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन नौनिहालसिंग जागीरदार यांनी केला. सूत्रसंचालन कुलप्रकाशसिंग लिखारी यांनी केले.