Home / राज्य / नांदेड मनपा क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती

नांदेड मनपा क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती

क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती

नांदेड महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व करावयाच्या कामांचा आढावा मंगळवार दिनांक 22.04.2025 रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी घेतला. त्याचप्रमाणे क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा विहित कालावधीत प्राप्त होण्यासाठी महापालिकेतील उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांची *पालक अधिकारी* म्हणून नेमणूक करण्याचे आदेश सुद्धा यावेळी मनपा आयुक्तांनी निर्गमित केले आहेत.

महापालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा यापूर्वी मनपा आयुक्तांनी दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी बैठक घेऊन सर्व विभागांना कामांचे वाटप करून दिले होते. त्याअनुषंगाने आज दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी आयुक्त यांनी मान्सुन पूर्वतयारीच्या अनुषंगाने पुनश्च बैठक घेऊन महानगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुखांनी दिलेल्या निर्देशानुसार काम केले अथवा नाही ? याचा आढावा महापालिका आयुक्तांनी घेतला.

सदर बैठकीमध्ये शहरात मनुष्यबळा‌द्वारे, जेसीबी‌द्वारे व पोकलेन मशीन‌द्वारे काढावयाच्या नाल्यांचा आतापर्यंत झालेल्या कामांच्या सद्यस्थिती बाबत आढावा घेण्यात आला तसेच पुढील कामे जलद गतीने करण्याकरिता निर्देशित करण्यात आले. शहरात मनुष्यबळ‌द्वारे एकुण 177 नाले तर जेसीबी‌द्वारे 79 व पोकलेन मशीन‌द्वारे 43 नाले सफाई चे काम सुरू करण्यात आले आहेत. बैठकीदरम्यान कामास गती देण्याकरिता आयुक्त यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना निर्देशित केले आहे.

सदरील काम वेळेच्या आत पूर्ण होण्याकरिता कोणत्याही प्रकारची मशीनरी कमी पडता कामा नये यासाठी यांत्रिकी विभागाला विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. शहरातील सखल भागामध्ये पाणी साचू नये याकरिता वेगवेगळ्या विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी दोन किंवा तीन विभागांचे काम आहे त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना समन्वय ठेवण्याकरिता निर्देशित करण्यात आलेले आहे. नाले सफाईच्या कामात जे काही अडथळे येतील ते काढून नाले प्रवाहित करण्याकरिता संबंधितांना आदेश देण्यात आलेले आहेत. शहरातील होर्डिंग बाबत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वे करून अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते विकास कामामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेणारे नाल्यांचे जोडण्या शिल्लक असुन सदर जोडण्या येणाऱ्या पावसाळ्यापुर्वी करुन घेण्यासाठी शहर अभियंता यांच्याशी समन्वय साधुन पूर्ण करुन घेण्याकरिता निर्देश देण्यात आले आहेत.
नांदेड महापालिका प्रभागाची व क्षेत्रिय कार्यालयाची रचना,व्याप्ती, लोकसंख्या व प्रशासकीय सुलभता इत्यादी बाबी लक्षात घेऊन मनपाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा दर्जेदार व विहित वेळेत करण्यासाठी, शासनाचे धोरणात्मक निर्णय विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजना तसेच नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण प्रभावीपणे करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयासाठी पालक अधिकारी म्हणून एकूण तीन उपयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये श्रीमती सुप्रिया टवलारे यांना क्षेत्रीय कार्यालय क्र.1 व 2 ची जबाबदारी देण्यात आलेली आहे तसेच उपायुक्त स.अजितपालसिंग संधु यांना क्षेत्रीय कार्यालय क्र. 3 व 4 त्याचप्रमाणे उपयुक्त नितीन गाढवे यांना क्षेत्रिय कार्यालय क्र.5 व 6 ची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
1) पाणीपुरवठा मल्लिसारण स्वच्छता बांधकाम विद्युत इत्यादी स्थानिक व अत्यावश्यक सेवांच्या संबंधातील नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने निकाली काढणे तसेच पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन मलप्रवाह विल्हेवाट मलनिसारण वादळी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, स्वच्छता विषयक संबंधित शिफारशी करुन क्षेत्रीय कार्यालयात केलेल्या कामांचा आढावा घेणे.
2) शहरातील नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार तात्काळ निकाली काढण्यासाठी स्थळ पाहणी करून तक्रारीचे स्वरूप लक्षात घेऊन स्वतःच्या अधिकारात संबंधित काम करून घेण्याचे अधिकार या पालक अधिकाऱ्यांना असणार आहेत.
3) वित्तीय अधिकाराच्या स्वरूपात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 69 अन्वये क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सर्व कामे करण्यासाठी वार्षिक रु.50 लक्ष पर्यंतचे प्रशासकीय व आर्थिक मान्यता प्रदान करण्याचे अधिकार या पालक अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी बहाल केलेले आहेत.
4) एकंदरीत या पालक अधिकाऱ्यांच्या नेमणुकीमुळे क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील शहरातील नागरिकांची कामे अधिक जलद गतीने व सुलभ पद्धतीने होण्यास मदत होणार असून नागरिकांना मूलभूत नागरिक सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा सोईचे होणार आहे.
शहरातील नागरिकांना आता क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील कामासाठी मुख्य कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच त्यांच्या तक्रारीचे निराकरण तातडीने हे पालक अधिकारी करतील असा विश्वास यावेळी मनपा आयुक्तांनी व्यक्त केला. त्याअनुषंगाने महापालिकेची सेवा शहरातील नागरिकांना तत्परतेने उपलब्ध होईल या दिशेने हे पाऊल टाकत असल्याचे यावेळी महापालिका आयुक्तांनी सांगितले.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपआयुक्त स.अजितपालसिंग संधू, उपआयुक्त सुप्रिया टवलारे, उपआयुक्त नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्य्क संचालक नगररचना आलुरकर.पी.एल, पशुशल्य चिकित्सक डॉ.रईसोद्दीन, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, सहाय्यक आयुक्त स्वच्छता गुलाम सादेक, कार्यकारी अभियंता श्री विश्वनाथ स्वामी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, क्षेत्रिय अधिकारी रमेश चौरे,राजेश जाधव, रावण सोनसळे, निलावती डावरे, गौतम कवडे तसेच बांधकाम व मलः निस्सारण विभागातील उप अभियंता व कनिष्ठ अभियंता ईत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल